SSM दहीहंडी




गेली कितीतरी वर्षे आपल्या शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळाच्या प्रांगणात संस्थेच्या सर्व विभागांतील विद्यार्थ्यांचा दहीहंडी उत्सव संस्थेचे संस्थापक आदरणीय भाऊसाहेब लोकेगावकर आणि सुनंदाताई लोकेगावकर यांच्या संकल्पनेतून साजरा केला गेला. आजही माननीय राजन लोकेगावकर सर आणि शुभदा लोके गावकर यांनी तो वसा चालू ठेवला आहे. 
दहीहंडी उत्सव म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीलांपैकी एक खेळ. ज्यात बाळगोपाळांचे कौशल्य पणास लागते, तसे तर श्रीकृष्णाच्या सर्वच खेळांमध्ये कौशल्य असणे अनिवार्य असते. शिवाजी विद्यालय व कन्याशाळेत जेवढे अभ्यासावर लक्ष ठेवले जाते तेवढेच लक्ष अभ्यासेतर गोष्टींवर असते. विविध स्पर्धा, उपक्रम संस्थेत राबविले जातात. 
दहीहंडी फोडणे, गोपाळकाला करणे ही संकल्पना आदरणीय सुनंदाताई यांची. आपल्या विद्यार्थ्यांना आपले हिंदू सणवार समजावेत, आपल्या रीतिरिवाजांची ओळख लहान वयातच व्हायला पाहिजे असाच त्यांचा अट्टाहास असे व त्याप्रमाणे संस्थेच्या सर्व विभागात सणवार आवडीने साजरे केले जात असत. आजही ही परंपरा तशीच ठेवली आहे संचालक माननीय राजन लोकेगावकर सर व शुभदा लोकेगावकर यांनी आणि सध्या तो वारसा चालवत आहेत माननीय अधिराज लोकेगावकर सर.

नित्यानंद बालमंदिर या आमच्या पूर्व प्राथमिक शाळेपासूनच सणवार साजरे करण्याची सुरुवात होते. त्यातील एक सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी.  छोट्या बालगोपाळांकडून दहीहंडी फोडण्याचा सराव आधीच ७-८ दिवस केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी यथासांग पूजा करून गोपाळकाला जातो. सर्व बालगोपाळ छान छान ड्रेस घालून येतात. काही कृष्ण बनून येतात, तर मुली राधा बनून येतात. १ थराची दहीहंडी लावली जाते आणि ती या नटलेल्या बाल गोपालांकडून फोडली जाते. ते दृश्य अगदी पहाण्याजोगे असते.
या वर्षी सुद्धा दहीहंडी झाली. नित्यानंद बालमंदिरची झाली, त्यानंतर Castle Black black International school ( शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळाची नवीन शाळा) ची झाली, मग कन्या शाळेची झाली व शेवटला शिवाजी विद्यालयाची सुद्धा झाली. कन्याशाळेच्या क्रीडा शिक्षिका, छत्रपती पुरस्कार विजेत्या माजी कबड्डीपटू वीणा खवळे- शेलटकर यांनी आधी २-३ दिवस विद्यार्थिनींचा सराव करून घेतला होताच. ही हंडी नीट बांधणे हे काम महत्त्वाचे असते, जे रवी मेस्त्री व राजू नायनाक या दोघांनी सकाळी लवकर करून घेतले होते. साधारण ११ नंतर दहीहंडी फोडण्यासाठी बालमंदिरचे छोटे आले आणि ढोल ताशांच्या गजरात हंडी फोडून नाचू लागले. त्यांच्या मुख्याध्यापिका अक्षता पेडणेकर स्वतः जातीने यात आपल्या सहकारी शिक्षिकांसोबत छोट्यांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत होत्या. त्यानंतर Castle Black International School ची हंडी सुद्धा त्यांच्या छोट्यांनी फोडली. Castle Black International School च्या In- Charge डॉ. गौरवी मॅडम स्वतः तिथे होत्या. मग आल्या कन्याशाळेच्या विद्यार्थिनी. खवळे मॅडमच्या शिटीच्या तालावर विद्यार्थिनी तयार झाल्या होत्या ते जाणवत होतेच. त्यांची हंडी फोडून झाल्यावर बॉईज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक नव्हे तर ४ हंड्या फोडल्या. अर्थात ही मोठी मुले असल्याने त्यांच्या हंडी फोडण्यात एक वेगळेच तेज असते. वय मोठे असते, थोडाफार अनुभव असतो पण छोटे असो की मोठे असो, मुलींनी हंडी फोडली काय किंवा मुलांनी हंडी फोडली, ती हंडी फोडतानाचा थरार किंवा हंडी फोडून झाल्यावर त्याचा आनंद मात्र सर्वांचा सारखाच असतो.  
आपले हिंदू सण म्हणजे सर्वजण एकत्र येण्याचा सुदिन असतो. त्याचा प्रत्यय दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आलाच. 
रवी मेस्त्री, राजू नायनाक, क्रीडा शिक्षिका वीणा खवळे-शेलटकर, इतर सर्व शिक्षिका, पेडणेकर मॅडम, त्यांच्या सहकारी शिक्षिका, Castle Black चे सर्व शिक्षक, बॉईज हायस्कूलचे ढगे सर आणि इतर सहकारी शिक्षक-शिक्षिका या सर्वांचे खरंच कौतुक आहे दहीहंडी उत्सव सुव्यवस्थेने पार पाडला. या सर्वांचेच मनापासून आभार. 


                    ज्योती राणे
एस एस एम सी एम गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....