अटल लॅब .... शिवाजी विद्यालयच्या विद्यार्थ्यासाठी....
भारत शासनाचा विचार गट, नीती आयोगातर्फे 'अटल इनोवेशन मिशन ' हा फ्लॅग शीप प्रोग्रॅम विद्यार्थ्यांमध्ये उद्योगजकता वाढीस लागावी तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी या दृष्टीने राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविले. या अंतर्गत अटल टिंकरींग लॅब ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत भारतातील शाळांना केंद्र सरकारकडून २० लाखाचे अनुदान प्राप्त करून दिले जाते. त्यातील पहिल्या १२ लाखात सरकारच्या वतीने एक अख्खी रोबोटिक लॅब उभारून दिली जाते. फक्त शाळेकडून १५ ००चौ मी एवढ्या क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करून द्यावी लागते. सर्वप्रथम त्यांच्या वेबसाईटवर शाळेचे रजिस्ट्रेशन करावे लागते. केंद्र सरकारच्या निती आयोगातर्फे त्यांचे वेंडॉर्स त्या त्या शाळेला अप्रोच करतात. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आपल्या शाळेचा नंबर त्यात लागू शकतो. राष्ट्रीयकृत बँकेत शाळेला खाते काढावे लागते. एकदा का रक्कम आली की वेंडोर त्यांचे काम करायला मोकळे.
जानेवारी २०२० मध्ये एक दिवस अटल लॅब संबंधी मीटिंग बीएआरसी मध्ये शिक्षण विभागाकडून आयोजित केली गेली होती. ती मीटिंग आमच्या दराडे मॅडमनी अटेंड केली. दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांनी सगळा तपशील दिला. अर्थात त्यावेळी तेवढी जागा आपल्या शाळेत नाही असे वाटल्यामुळे माझे दुर्लक्ष झाले. पण दोन महिन्यांनी मार्च २०२० मध्ये आमची माजी विद्यार्थिनी अंकिता विश्वासराव आली आणि तिने पूर्ण माहिती दिली व मी तिला घेऊन आमचे संचालक माननीय राजन लोकेगावकर सर यांना भेटले. सरांना ही रोबोटिक लॅबची संकल्पना खूप आवडली. सरांनी त्वरित मला 'याचे रजिस्ट्रेशन करा ' असे सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही महिन्यांनी निती आयोगाचे मेल आले व प्रत्यक्ष रोबोटिक लॅबच्या म्हणजे अटल लॅबच्या उभारणीसाठी पूर्वतयारी सुरू झाली. आपल्या संस्थेच्या चौथ्या मजल्यावर जी जागा आहे ती आपण यासाठी उपयोगात आणूया असे सरांनी सांगितले होते. अंकिता विश्वासराव रोबोकार्ट या कंपनीमध्ये शाळांना अटल लॅब उभारून देण्यासाठीचे कामकाज पाहते. रोबोकार्ट ही कंपनी यासाठी वेण्डोर म्हणून काम करते. अंकिताच्या हातात बऱ्याच गोष्टी असल्याने पुढचे सगळे एकदम सोपे झाले होते. मात्र मार्च २०२०ला जगभर कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि काम ठप्प झाले. त्यानंतर वर्ष गेले आणि नीती आयोगाकडून पहिली १२ लाखाची रक्कम जानेवारी २०२१ ला शाळेच्या खात्यात जमा झाली आणि काम भराभर सुरू झाले. १९८१ च्या बॅचच्या बाळा तुळसकर आणि त्यांचे काही मित्र यांनी अटल लॅबच्या कामासाठी आपले आर्थिक योगदान दिले होते. दरम्यान जून नंतर अंकिता शाळेत येऊन काही डॉक्युमेंटेशन करत होतीच. खरेतर संस्थेने जवळजवळ २४०० चौ.मी. ची जागा उपलब्ध करून दिली होती. अंकिताने अगदी काही महिन्यात लॅबच्या उभारणीसाठी खूप मेहनत घेतली. जूनमध्ये ऑनलाइन शाळा सुरू झाली. पण अटलचे काम मात्र बंद होते. जसे पहिला लॉकडाऊन ओपन झाला तसे पुन्हा काम सुरू झाले. कामाची गती मंदावली होती तरी अटल लॅब साकारत होती. काम संपले आणि आता उद्घाटन करण्याचे ठरवले. शिक्षक किंवा विद्यार्थी शाळेत येऊ शकत नव्हते. आम्ही जवळ राहणारे शिक्षक व काही माजी विद्यार्थी, संचालक माननीय अधिराज सर असे मोजून काहीच मंडळी होती. पण जे काही करायचे ते ऑनलाइन सर्व विद्यार्थ्यांना दिसले पाहिजे, कळले पाहिजे या हेतूने ऑनलाइन ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीने उद्घाटन यशस्वीरित्या झाले. मे २०२१ ला ही उद्घाटन केले गेले.
ऑनलाइन शाळा तर चालूच होती. विद्यार्थिनिना अटल लॅबमध्ये शाळेत येणे शक्य नव्हते मग यावर तोडगा म्हणून शिक्षकानी आपण ते सुद्धा ओणलीनेच घेऊया असे सुचवले. रोबोकार्ट कंपनीतून ट्रेनर पाठवला जाणार हे अंकिताने सांगितले होतेच. त्याने शाळेत येऊन अटल लॅबमधून विद्यार्थिनींचे ऑनलाइन ट्रेनिंग घेतले. ट्रेनर ऑफलाईन शाळेत आणि विद्यार्थिनी ऑनलाइन शाळेत.. असा विरोधाभास होता. पण त्याला काही पर्याय नव्हताच. ऑक्टोबर २०२१ ला ४ तासांची ऑफलाईन शाळा सुरू झाली आणि एक तासिका अटल लॅबमध्ये विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष शिकावे अशी सूचना शिक्षकांनी केली. त्यानुसार एक तासिका त्यांना दिली सुद्धा. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मात्र शाळा पूर्ववत सुरू झाली. अटलमध्ये २ तासिका विद्यार्थिनी जाऊ लागल्या. अटल लॅबच्या एम ओ यू मध्ये दिलेले आहे की इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा लॅबचा फायदा करू द्यायचा. आम्ही मग आमच्या संस्थेची शाळा शिवाजी विद्यालयच्या विद्यार्थ्यांना ही संधी दिली. ते सुद्धा २ तासिका अटल लॅबमध्ये येऊन रोबोटिक्स शिकू लागले.
आपल्या समाजामध्ये मुलींना काही क्षेत्रामध्ये कमी लेखले जाते. त्यातलेच एक क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी विभाग. पण हे चित्र हळूहळू सुधारताना दिसत आहे.पण जर त्यांनाही योग्य प्रशिक्षण मिळाले तर त्याही कमी पडत नाहीत. आता तर चांद्रयान-३ चंद्रावर उतरताना आपण सर्वानीच पहिले की इस्रोमध्ये महिला शास्त्रज्ञ आहेत. हेच कशाला आज पायलट, आर्मी मध्ये ऑफिसर्स म्हणून, लोकोमोटिव्हची चालक, कितीतरी क्षेत्र आहेत की जिथे महिला कार्यरत आहेत. गेल्या १०-२० वर्षांत चित्र बदलेले दिसत आहे. जर मुलींना त्यांच्यातील क्षमता शालेय वयातच समजल्या तर पुढे त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. याच हेतूने संस्थेने रोबोटिक लॅबसाठी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम विद्यार्थिनी आवडीने रोबोटिक्सचे ज्ञान ग्रहण करत आहेत.
अटल लॅबच्या इन चार्ज म्हणून एका शिक्षिकेची करावी लागते. कन्याशाळेतील विज्ञान व गणित शिक्षिका तोडकरी मॅडम यांची नियुक्ती केली. तोडकरी मॅडम म्हणजे ख-या विज्ञान शिक्षिका. वेगवेगळे उपक्रम राबविणा-या, ज्यांच्या व्हिजन मध्येच त्यांनी म्हटले आहे की त्यांना विज्ञानाधिष्टीत विद्यार्थी घडवायचे आहेत, राष्ट्रीय सायन्स काँग्रेस तर्फे होणा-या संशोधन आधारित प्रकल्पासाठी विद्यार्थिनींवर खूप मेहनत घेणा-या अशा तोडकरी मॅडम यांनाच इन चार्ज करणे अपरिहार्य होते. त्यांच्यासोबत हजारे मॅडम, साळवे मॅडम, धादवड मॅडम या विज्ञान शिक्षिका सुद्धा खूप मेहनत घेऊन रोबोटिक्स विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करत असतात. यावर्षी आम्हांला अजून एक व्यक्ती या आमच्या मिशन मध्ये सहभागी करता आली.आमचे माजी विद्यार्थी प्रमोद कुमठेकर. स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून स्वतःची छोटी कंपनी ते चालवतात. स्वतःच्या बिझी शेड्युलमधून शाळेसाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढतात.
योग्य माणसाच्या हातात रोबोटिक्स लॅबचे सुकाणू दिल्यावर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांची नाव अटल मॅरेथॉनमध्ये जोरात प्रगतीपथावर धावेल असा आम्हांला विश्वास आहे. या सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच आणि आभार सुद्धा मानावे तितके कमीच आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे संचालक माननीय राजन लोकेगावकर सर, शुभदा लोकेगावकर मॅडम, अधिराज लोकेगावकर व गौरवी मॅडम या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्यामुळे आज विद्यार्थ्याना या नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करायला मिळत आहे.
ज्योती राणे
एस एस एम एम सी एम् गर्ल्स हायस्कूल
टिप्पण्या