आतुरता तुझ्या आगमनाची....



दरवर्षी गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी आमच्या कन्याशाळेत कला शिक्षिका रेश्मा नलावडे मॅडम गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा घेतात. या निमित्ताने विद्यार्थिनी गणेशाचे आसन, त्याची सजावट आधीच करून आणतात. माती नीट मळून घेतलेली असेल तर मुर्ती साकारणे सोपे जाते, म्हणून माती सुद्धा मळून आणली जाते. फक्त बाकी असते ती मूर्ती बनविणे, जे खरेच कौशल्य आहे आणि कोणतेही कौशल्य सरावाने येतेच. इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थिनींना क्ले आणायला सांगितले जाते. दोन वर्षे त्याच्यावर सराव केल्याने ७ वी नंतर मात्र विद्यार्थिनी थोड्या मातीकामाला सरावतात. ९ वी, १० वी ला बऱ्यापैकी मातीकाम जमतेच. सर्वात महत्त्वाचे असते ते आपल्या हातून गणेश मूर्ती घडण्याचा आनंद. हा आनंद विद्यार्थिनींना मिळावा याच हेतूने नलावडे मॅडम ही स्पर्धा घेतात. 
या वर्षी बॉईजचे किशोर तेली सर यांच्या मनात एक कल्पना आली आणि ती त्यांनी अस्तित्वात आणली. लालबाग मधील सुप्रसिध्द गणेश मूर्तिकार माननीय राजन झाड यांचा डेमो आपण विद्यार्थ्याना दाखवू आणि नंतर दुसऱ्या दिवशी स्पर्धा घेऊ असे त्यांनी नलावडे मॅडमना सुचविले. पण त्यांना आणायचे कसे? हा मोठा प्रश्न होताच. त्यांची पुतणी अर्याही झाड याच वर्षी शाळेत नवीन प्रवेश घेऊन दाखल झाली आणि तिचे बाबा रुपेश झाड हे तेली सरांचे बॅचमेट. ' त्यांनाच सांगूया की होईल आपले काम ' असे तेली सरांना वाटले आणि त्यांच्याशी बोलणे झाले. पण गंमत अशी की  पुतणीचा हट्ट सरस ठरला आणि राजन झाड यायला तयार झाले. 

सोमवार २८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत हा डेमो घ्यायचा, कन्याशाळेसोबत बॉईजचे ड्रॉइंग परीक्षेला बसणारे विद्यार्थी या डेमोला उपस्थित राहतील असे शनिवारी ठरले. सोमवारची उत्सुकता सर्वांनाच होती. 
सोमवारी सकाळी सगळी अरेंजमेंट करायला नलावडे मॅडम, रवी मेस्त्री आणि स्वयंसेविका विद्यार्थिनी शाळेच्या आवारात आले आणि पटापट सगळी तयारी सुरू झाली. प्रकाश मारूच्या मदतीने साफसफाई झाली, राजू नायनाकने त्याच्या सहकाऱ्यांना  घेऊन पडदे, खाली बसायला mat घालून दिले. अगदी तासा दीड तासात विद्यार्थ्यांसाठी तयारी झाली. विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना त्यांच्या बसवून घेतले आणि तेली सरांनी राजन झाड व त्यांचे सुपुत्र विदिष यांना प्रांगणात आणले. सहाय्यक शिक्षिका दिपाली दराडे मॅडमनी त्यांचे सहर्ष स्वागत केले, त्यांच्याबद्दल विद्यार्थ्याना माहिती दिली आणि त्यांना गणेश मूर्ती साकारण्याची विनंती केली. तत्पूर्वी 'काही मार्गदर्शन करा '  असे म्हणता राजन सर ' मला बोलायला जमत नाही, ते आमचे काम नाही ' असे हसत सांगू लागले. माती मागितल्याबरोबर ७-८ विद्यार्थीनींनी आपल्याकडची मळलेली माती दिली. विदिषने मूर्तीचा पाया सुरू केला आणि त्याला मदत करता करता कधी राजन सरांनी मूर्ती घडविली ते कळलेच नाही. राजन झाड यांची गणेश मूर्ती म्हणजे त्या मूर्तीचा प्रसन्न चेहरा आणि गंडस्थळ. तो त्यांचा यूसपी आहे म्हटले तरी चालेल. मूर्ती सुरू करायला सुरुवात केली त्यापासून ते ती पूर्ण करेपर्यंत व्हिडिओ करता आला. 
मूर्ती साकारल्या नंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना संचालक माननीय अधिराज लोकेगावकर यांच्या ऑफिस मध्ये राजन झाड यांना घेऊन गेलो तेव्हा आम्हाला कळले की त्यांचे वडील विठ्ठल झाड यांनी बनवलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती संचालक माननीय राजन लोकेगावकर यांच्या ऑफिसमध्ये आहे. ही तर आमच्या सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती. इतकी वर्षे सरांच्या ऑफिस मध्ये कामानिमित्त जातो पण हे काही लक्षात आले नव्हते. दुसरी एक गोष्ट राजन झाड यांनी सांगितली होती की ते शिरोडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी. शाळेत असताना ड्रॉइंग परीक्षा त्यांनी दिल्या नव्हत्या. पण नंतर आमच्या शाळेतून म्हणजे शिवाजी हायस्कूल त्या परीक्षांचे केंद्र असल्याने त्यांनी त्या परीक्षा इथून दिल्या होत्या. ' कुणाची नाळ कुणाशी कशी जोडलेली असते ' ते बाप्पाच जाणे. दोघेही पिता पुत्र शाळेतून खुश होऊन निघाले होते. ' बऱ्याच काळानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला ' असे राजन झाड बोलले. खरंतर आत्ता या त्यांच्या बिझी शेड्युल मधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी २-३ तास वेळ देणे सोपे नाही. पण केवळ लाडक्या पुतणी साठी ते आले. तो दिवस आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाचा होता. आमच्या विद्यार्थ्याना आम्ही एक वेगळा अनुभव दिला याचे समाधान आम्हाला होते. 

दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यार्थिनीची गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा होती. त्याप्रमाणे सकाळी ७.३० पासूनच नलावडे मॅडमनी तयारीला सुरुवात केली आणि स्पर्धा सुरू झाली. त्याच दरम्यान ठरल्याप्रमाणे कालचा डेमो स्क्रीनवर दाखवण्यात आला. ३-४ तासानंतर परीक्षण सुरू झाले आणि नलावडे मॅडमनी सर्व बक्षीस पात्र विद्यार्थिनींचे फोटो काढले. स्पर्धा चालू असताना व्हिडिओ, फोटो काढणे चालू होतेच. 
हे दोन दिवस म्हणजे आमच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाचा अनुभव होता. Experiential learning जे आजकाल चर्चेत असते ते आम्ही आमच्या विद्यार्थिनींकडून कितीतरी वर्षे करून घेत आहोत. 

या दोन दिवसांमध्ये नलावडे मॅडम, तेली सर, दराडे मॅडम, रवी मेस्त्री, राजू नायनाक आणि त्याचे सहकारी, सुचिता कदम, विशेषतः आमच्या स्वयंसेविका आणि इतर सर्वच शिक्षक या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक. सर्वात कौतुक त्यांचे ज्यांनी माती मळलेली आहे का असे राजन झाड यांनी विचारले असता पटकन दफ्तरातून काढून देणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी. आमच्या विद्यार्थिनींना निःशुल्क माती देणारे आमच्या माजी विद्यार्थिनीचे काका श्री. सारदळ यांचे मनापासून आभार.
आमचे संचालक माननीय राजन लोकेगावकर व शुभदा लोकेगावकर, अधिराज लोकेगावकर व गौरवी लोकेगावकर हे सगळेच आम्हाला मार्गदर्शन करतातच पण आमच्या उपक्रमांना पाठींबा देतात त्याबद्दल त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार. 
आपल्या बिझी शेड्युल मधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी आलेले मूर्तिकार राजन झाड व त्यांचे सुपुत्र विदिष या दोघांचे तर आभार मानावे तितके कमीच आहेत. 


                               ज्योती राणे
         एस एस एम एम सी एम गर्ल्स हायस्कूल 

टिप्पण्या

निनावी म्हणाले…
कलाशिक्षिका म्हणून मला अभिमान वाटतो की, शाळेच्या मुख्याध्यापिका असूनही एका उपक्रमाची अगदी इस्तंभूत माहिती त्यांना आहे. त्याचे कारणही तसेच आहे सगळ्यांचे न विसारता कौतुक करणाऱ्या मॅडम स्वतः प्रथम आम्हा शिक्षकांसह उभ्या असतात. त्याची आणि लोकेगावकर सरांची हीच कौतुकाची थाप नाविन्यपूर्ण गोष्टींची प्रेरणा ठरते. या साऱ्यात साथ देतात माझ्या गुणी विद्यार्थिनी, एखादी गोष्ट शिकायची, करायची म्हटलं की ती पूर्णत्वास न्ह्यावी हा एकच ध्यास त्यांच्या कृतीत असतो. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या साऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

SSM दहीहंडी

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....