By the students.... for the students...

लोकशाहीची व्याख्या आहे - ' By the people, for the people, of the people ' सर्वानाच ही व्याख्या माहीत आहे. आमच्या शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच काहीसे म्हणावे लागेल. ' By the students, for the students, of the students ' यात फक्त बदल असा करावा लागेल की 'माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी...... ' हे वाचून प्रश्न पडेल की नक्की काय आहे. जेव्हा वयाच्या एका टप्प्यावर माजी विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा त्याला आजच्या काळात ' Reunion' म्हणतात. सध्या या reunion चे प्रचंड फॅड आले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण याच reunion मध्ये जेव्हा शिक्षकांना बोलवले जाते, त्यांचा सन्मान केला जातो, शाळेविषयी आपुलकी, जिव्हाळा, ऋण यासारख्या शब्दांत व्यक्त केले जाते तेव्हा शिक्षकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. या  ' Reunion' च्या निमित्ताने माजी 
विद्यार्थी शाळेकडे परत येऊन ऋणानुबंध पुन्हा वाढविण्यास सुरुवात करतात. सांगायचे झाले तर माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेला ऊर्जितावस्था देतात, शाळेचे रुपडे पालटून टाकतात. हे होते ते केवळ ' माझी शाळा, माझी आई ' याच भावनेने. 'आईला कुणी कधी दूर लोटते का? ' अगदी असेच आमच्या शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगता येईल. जेव्हा एक विद्यार्थी शाळेत शिक्षक म्हणून काम करतो तेव्हा त्याला शाळा आणि प्रशासन याची संपूर्ण माहिती असते. त्यातूनही जेव्हा तो विद्यार्थी आपल्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत असतो तेव्हा तर जास्तच. आपली शाळा, तिने केलेले संस्कार आपणही चालवावे याच भूमिकेत तो किंवा ती ईमानइतबारे काम करत असतात. 
शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे आव्हान स्विकारले संचालक माननीय अधिराज सरांनी. ते स्वतः माजी विद्यार्थी शिवाजी हायस्कूलचे. त्यांना साथ मिळाली ते  किशोर तेली सर, मंदार आंबेरकर व राहुल तिवरेकर या सर्वांची. किशोर तेली स्वतः ज्या शाळेत शिकले त्या शिवाजी विदयालयात गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंदार आंबेरकर हे स्वतः साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत. राहुल तिवरेकर एक समाजसेवक. त्यांची स्वतःची दिगंत स्वराज फाऊंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था आहे, त्यामार्फत ते वाडा मोखाडा या दुर्गम आदिवासी भागात कार्य करतात. आपल्या शाळेत सुद्धा स्पॉन्सरर्स कडून आर्थिक सहाय्य घेऊन चांगले काम करावे या हेतूने आधी इमारतीच्या नूतनीकरणाकडे लक्ष देऊ या अधिराज सरांच्या म्हणण्यानुसार या त्रयीने माजी विद्यार्थी व काही कंपनीचा सीएसआर फंड जमवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अशा प्रकारे  'और कारवाॅं जुडता गया.... ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या त्रयीने आपल्या आणि मागच्या पुढच्या मित्रांना हाक दिली आणि मित्र धावून आले. केवळ आणि केवळ शाळेसाठी.... शाळेचे रूप पालटण्याचे शिवधनुष्य उचलले आणि बॉईज व गर्ल्सच्या शाळांचे तिसऱ्या मजल्यावरचे काम सुरु झाले. इतकेच नव्हे तर काही महिन्यांतच पूर्ण करून दाखवले. त्या सर्व वर्गांच्या पुनर्नवीकरणामध्ये  सर्वात मोठा वाटा होता तो माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहभागाचा.  १९८७,८८,९२ अशा कितीतरी बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले आहे. 
माझी शाळा इतर शाळांच्या तुलनेत सुंदर दिसली पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत वर्गांत बसल्यानंतरचा आनंद मिळाला पाहिजे, या भावनेने आणि शाळेविषयी असलेली आपुलकी म्हणा, प्रेम म्हणा माजी विद्यार्थी धावून आले. हल्ली मराठी माध्यमाच्या शाळा बंद होताना दिसत आहेत. शाळेतील शिक्षण इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड आहे तर आपली शाळा मागे पडता नये, बंद होऊ नये या भावनेने माजी विद्यार्थी आर्थिक सहभाग देऊ लागले. त्याचे लोकार्पण १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साधून करण्यात आले. त्या कार्यक्रमाला ज्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली होती त्यांचा सत्कार संस्थेने केला. शाळेचा वीजपुरवठा जर सोलार पॅनेलने केला तर शाळेचे भरमसाठ बिल वाचवू शकतो हा दृष्टिकोण माननीय संचालक अधिराज सरांचा होता. त्याप्रमाणे एनजीओची मदत घेऊन शाळेत सोलार पॅनेल बसवले गेले. नुकतेच १५ ऑगस्टला त्याचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक श्री. ए. डी. जाधव सर यांच्याहस्ते करण्यात आले. अधिराज सरांच्या दूरदृष्टीचे कौतुक आहेच. 
आता अजून एक पाऊल पुढे टाकायचे होते, ते  शाळेच्या संगणक कक्षाचे नूतनीकरण करण्याचे. सौ. वैशाली तावडे, पूर्वाश्रमीची वैशाली सावंत ही फार्मासितील पी एच डी पदवी धारक, जिच्या नावावर काही औषधांची पेटंट आहेत, सध्या ती एका कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट आहे, तिच्या कंपनीचा सीएसार फंड तिने व तिच्या ऑफिसच्या टीमने शाळेसाठी देऊ केला. शाळेत संगणक कक्ष होताच पण तिचे रूप पालटले ते अगदी कात टाकून दिल्याप्रमाणेच. तब्बल ४० अद्ययावत संगणक आणि त्या रूमचे नूतनीकरण होऊन संगणक कक्ष एसी झाला. नव्या को-या संगणकावर शिकायला मिळालेला आनंद विद्यार्थिनींच्या चेह-यावर दिसतो. या संगणक कक्षाचे उदघाटन १ मे २०२३ रोजी वैशाली तावडे व तिचे ऑफिसमधील सहकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तिचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या, विशेषतः तिच्या बाबांच्या चेह-यावर दिसणारा मुलीविषयीचा अभिमान दिसून येत होता, शाळेने तिला दिलेला मान ज्यामुळे त्यांनाही कृतकृत्य झाल्यासारखे जाणवत होते. 
फक्त आर्थिकच नव्हे तर आपला बौद्धिक सहभाग सुद्धा शाळेच्या ब-याच कार्यक्रमांमध्ये दिसून येतो. २६ जानेवारीचा सोहळा हा अख्ख्या काळाचौकी विभागात सुप्रसिद्ध आहे. अगदी त्याची आतुरतेने वाट पाहणारी शाळेची माजी विद्यार्थी मंडळी या दिवशी शाळेत येण्यासाठीचे बेत महिनाभर आधीच आखात असतात. त्यावेळी शालेय इमारत छान रंगरंगोटी करून सजलेली असते. तिची सजावट करण्यासाठी वर्षोनुवर्षे येणारे शिवाजी विद्यालयाचे कलाकार माजी विद्यार्थी कलाशिक्षक शंकर सोनावणेंच्या हाताखाली दिवसरात्र राबत असतात. रांगोळी काढणारे विचारे सर सुद्धा शिवाजी विद्यालयचे माजी विद्यार्थी. त्यांच्यासोबत असणा-या माजी विद्यार्थिनी, शाळेच्या भिंती बोलक्या करणारे मनोहर पेडणेकर हे सुद्धा शिवाजी विद्यालयचेच माजी विद्यार्थी. कन्याशाळेत कलाशिक्षिका म्हणून कार्यरत असणा-या नलावडे मॅडम, इंग्रजीच्या शिक्षिका दराडे मॅडम हे सगळेच माजी विद्यार्थी आपापल्या परीने सर्वजण शाळेसाठी आपले योगदान देत आहेत. इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थिनींचा शाळेत येऊन स्पेशल क्लास घेणारी स्मिता धुमाळ, आता हे धनुष्य उचलेले ते नरेंद्र मेस्त्री, २६ जानेवारीच्या कार्यक्रमात नृत्य नाटिका बसवणारे अमोल धुरी सर, सध्या हीच धुरा जिच्या खांद्यावर दिली आहे ती विजेता माने, एन टी एस ई शिष्यवृत्तीचा क्लास घेणारे व अटल लॅबचे मेंटॉर प्रमोद कुमठेकर, आपल्याच नाईट हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक असणारे गणेश दिवेकर, गेल्या वर्षी स्कॉलरशिपची पुस्तके शाळेला देणारी गीतांजली राणे व तिचे बाबा,तिची मैत्रीण हर्षदा रोकडे, शाळेला प्रोजेक्टर देणारे सावंत बहीण भाऊ अजय व पूनम.... अशी कितीतरी मंडळी (सर्वांचीच नावे घेणे शक्य नाही) पण हे सगळेच माजी विद्यार्थी फक्त आणि फक्त आपल्या शाळेच्या भविष्यासाठी झटताना दिसत आहेत. स्वतःच्या बिझी शेड्युलमधून शाळेसाठी वेळ काढणे तसे कठीणच असते, पण शिवाजी विद्यालय व कन्याशाळेचे माजी विद्यार्थी ते करतात हेच इतरांपेक्षा वेगळे आहे. 

टिप्पण्या

Pranita Purushottam Raul म्हणाले…
माजी विद्यार्थ्यांची ही खरचं कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
सर्वांच्या मनात शाळेच्या आठवणी रूंजी घालत असतात. शाळेसाठी वेळ देणे सर्वांच्या शक्य होतेच आहे नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेसाठी काहीतरी करण्याचे योजित आहेत.
शाळांची सध्याची स्थिती पाहता या विद्यार्थ्यांनी आपली मराठी माध्यमाची शाळा काळाप्रमाणे बदलण्यासाठी केलेले प्रयत्न अनमोल आहेत.
Pramod Kumthekar म्हणाले…
धन्यवाद मॅडम पण हे काम करायची प्रेरणा मुळात तुमच्या आणि नारकर सरांच्या मुळे मिळाली. शाळा चालवणे म्हणजे काय कसरत असते ते मागच्या दोन महिन्यात समजले आणि अनेक रूपातून हे जाणवले की संचालक म्हणून शाळा चालवणे तेही ग्रँट असलेली हे किती अवघड आहे. अनेकांना फक्त शाळेचे AC halls दिसतात आणि दिसते Castle Black International. त्यावरून ते स्वतःचे आडाखे बांधतात पण खरी परिस्थिती ही जवळ गेल्यावरच कळते. तेंव्हा बाह्य स्वरूपावर न जात एकदा आपली शिक्षकांना आणि संचालकांना भेटा मग तुम्हाला वास्तव कळेल. नुसते Reunion करू नका Unit होऊन शाळेसाठी काही तरी करूया

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

SSM दहीहंडी

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....