मीच माझ्या लेकीच्या जीवनाचा शिल्पकार....
नमस्कार पालक वर्ग....
मी, राणे मॅडम, मुख्याध्यापिका तुमच्या लेकीच्या शाळेची... म्हणजेच एस एस एम एम सी गर्ल्स हायस्कूल म्हणजे आपली शिवाजी हायस्कूलची कन्याशाळा.
लॉकडाऊन नंतर गेल्या वर्षीपासून आपली सर्वांचीच विस्कटलेली घडी सुरळीत व्हायला लागलेली आहे. लॉक डाऊनमध्ये शासनाने एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या उद्देशाने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मोबाईलचे माध्यम निवडायला सांगितले आणि त्याप्रमाणे शिक्षकांनीसुद्धा कधीही न वापरलेल्या माध्यमाचा उपयोग केला. त्यासाठी आधी ते स्वतः शिकले- Google meet, zoom meeting कसे वापरायचे, त्यावरून शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले अध्यापन यशस्वी कसे होईल, त्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत,ते माध्यम आत्मसात करून यशस्वीरीत्या वापरले. शाळा सुरू झाली तशी विद्यार्थी नेमके कुठे आहेत हे शिक्षकांच्या लक्षात येऊ लागले. गेल्या वर्षीपासून शाळा सुरळीत झाली. पण या दीड वर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अवस्था लक्षात आल्यावर मुख्याध्यापिका म्हणून माझ्याकडे शिक्षकांनी मांडलेल्या व्यथा आज मला तुमच्यासमोर मांडव्याशा वाटल्या म्हणून हा लेखनप्रपंच. त्यांच्या वतीने मी मांडत आहे.
गेल्या दीड वर्षात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती. शाळेत नियमितपणे येणाऱ्या या विद्यार्थिनी हल्ली शाळेत यायला का मागत नाहीत? मला माहित आहे की तुम्ही तुमच्या परीने त्यांना शाळेचे, शिक्षणाचे महत्त्व सांगत असालच पण मग त्या का शाळेत जात नाहीत याचे कारण आपणच शोधले पाहिजे ना! शिक्षकांच्या लक्षात आलेल्या गोष्टी मला तुम्हाला सांगाव्या असे मला वाटते.. एकतर शाळा सकाळची आहे आणि मुली रात्री उशिरापर्यंत जाग्या राहतात कारण एकतर टीव्ही किंवा मोबाईल. आई सकाळी उठण्याचा प्रयत्न करते पण लेक उठतच नाही, ऐकतच नाही असे कारण आपण सांगतो.. जर आपणच टीव्ही किंवा मोबाईल यावर बंधन ठेवले तर? दुसरे कारण असते बरेचदा असते ते म्हणजे कोणी शिक्षकांनी गृहपाठ दिला असेल व तो ज्या दिवशी मागितला असेल तर झाला नाही म्हणून शाळेलाच दांडी मारायची.
कारणे काहीही असोत मला वाटते की जर आपण थोडे कडकपणे धोरण अवलंबिले तर.. कसे आहे की एकदा शाळेला दांडी मारायची सवय झाली की ती कायम राहते.. शाळेत गैरहजर राहिल्याने विद्यार्थिनीची शैक्षणिक प्रगती खुंटते. काल जे झाले ते जर मी गैरहजर असेन तर मला दुसऱ्या दिवशी पुढचे कसे कळेल... मग पुन्हा दांडी.. आणि हेच वर्तुळ पूर्ण होते.. परिणामी विद्यार्थिनीला तो धडा, प्रकरण काही कळत नाही. तिलाच फक्त दोष देऊन चालणार नाही ना!!! आपण पालक म्हणून आपली जबाबदारी आहेच ना...आईने किंवा बाबांनी रोज वर्गात कोणत्या विषयाचे काय काय शिकवले एवढे तरी किमान आपण विचारू शकतो ना? त्यांना जाणवू देऊया की आपले त्यांच्याकडे पूर्ण लक्ष आहे.. आपण लक्ष देतोच पण अजून थोडेतरी करुया.. नक्कीच आपण करू याची खात्री आहे मला. दुसरे एक माता पालकांना सांगावेसे वाटते की आपण आपला स्वयंपाक करताना लेकीला जवळ बसवले आणि अभ्यासाचे, गोष्टीचे पुस्तक वाचायला लावले.. अर्थात मोठ्याने.. तर? आपल्याला कळेल तिला कितपत वाचन येते. रोजचे पाढे म्हणून घेऊ शकतो. तसे ते शाळेत घेतले जातातच. व्यवहारासाठी पाढे किती आवश्यक आहेत हे तर सर्वानाच माहीत आहे.. शाळेत १००% उपस्थित राहणारे विद्यार्थी नेहमीच अभ्यासात प्रगती करतात हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. तेव्हा शाळेची उपस्थिती किती महत्त्वाची आहे त्याचे महत्त्व आपणच तर सांगितले पाहिजे.. म्हणजे त्यांना जाणवू दिले पाहिजे... बाकी त्यांच्या अभ्यासाची तयारी शिक्षक करून घेत आहेतच...
तर पालकवर्ग हो.... माझ्या संपूर्ण शिक्षकवृंदाच्या वतीने कळकळीने मी सांगू इच्छिते की आपणच आपल्या लेकीच्या जीवनाचे शिल्पकार आहात... आपणांसर्वांसोबत आम्ही आहोतच...
धन्यवाद!!!!!
टिप्पण्या
प्रश्न पण मुलांना प्रतिकूल परिस्थितीशी लढणे कसे शिकवणार? वेळ व्यवस्थापन, श्रमप्रतिष्ठा यासारखी मूल्ये रुजवयची कशी? मुलांना सुरक्षित कोषात ठेवत गेलो तर पुढे कदाचित भारतीय खेळाडू,कलाकार,सैन्य - सैनिक पुस्तकात दिसू लागतील. त्यामुळे जर पालकांना आपली मुले- मुली छत्रपती शिवराय,झाशीची राणी,सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर घडवायची असतील
तर आईबाबांना थोडे कणखर व्हावेच लागेल.