विष्णुबागेतील एक दिवस

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी माझ्याकडे त्यांच्या वर्गशिक्षिका, साळवे मॅडम यांच्या सोबत ऑफिसमध्ये आल्या आणि मला सांगू लागल्या की आम्हाला पिकनिकला घेऊन चला. त्या आधीच काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी मला हे सांगितले होते की या वर्षी तरी आपण विद्यार्थिनींना शालेय सहलीस नेऊ. दोन वर्षांपूर्वी विष्णुबाग, बदलापूर येथे गेलो होतो. गेल्या वर्षी मुलींनी पैसे न दिल्यामुळे सहल रद्द झाली होती. मग यावेळी पण आपण तिथेच जाऊ असे सर्व शिक्षक म्हणाले. त्या या मुलींची भर पडली आणि मी तसाच कॉल केला प्रणिता रसाळ हिला. प्रणिता रसाळ म्हणजे सचिन रसाळची पत्नी. सचिन हा माझा विद्यार्थी. तो आता चिंचपोकळी येथे राहत नाही तर बदलापूरला राहतो. त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गेली बरीच वर्षे त्याने बदलापूर मध्ये या व्यवसायात जम बसवला आहे. विष्णुबाग सध्या त्याने चालवायला घेतले आहे. तसे तर सदानंद बाग सुद्धा तोच पाहतो. यापूर्वी मी माझ्या मैत्रिणीसोबत बदलापूरला बरेचदा पिकनीकला त्याकडेच जाऊन आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याने आम्हाला नेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सचिनचे जेवण. कौतुक करावे तेवढे कमीच. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणा पर्यंत. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा मेन्यू इतरांपेक्षा अगदी वेगळा असतो आणि ते चविष्ट. माझ्या सहकारी शिक्षिका सुद्धा जाऊन आल्या तेव्हा त्यांना त्याचे जेवण तर आवडलेच पण ठिकाणही आवडले. साफसफाई व्यवस्थित. त्यामुळे या वर्षी सुद्धा आपण तिथेच जाऊ असे शिक्षकांनीच सांगितल्यावर मी प्रणिताला कॉल केला आणि तारीख ठरवली,  मेन्यू ठरवला. पण तेवढे पैसे जमा झाले नाही म्हणून २०२५ या नवीन वर्षात २ जानेवारीला जायचे ठरले. जायचे तर एस. टी. बसेसच करायच्या. तीही ओळख मिळाली तेली सरांच्या मित्रामुळे. लगेच पालव मॅडम व  साळवे मॅडम Bombay Central Depot ला जाऊन चौकशी करून आल्या आणि काही दिवसातच गाड्या बुक सुद्धा झाल्या. 
सहलीचा दिवस उजाडला. तीन बसेस जाणार होत्या. सकाळी ६.३०/६.४५ या दरम्यान विद्यार्थिनींना शाळेत बोलावले होते. विद्यार्थिनी वेळेत शाळेत हजर. एस. टी. बसेस थोड्या लेट आल्या. पण ७.१५ वाजता आम्ही काळाचौकीतून निघालो. ट्रॅफिक न मिळाल्यामुळे बदलापूर पर्यंत व्यवस्थित गेलो. पण रस्ता थोडा चुकल्यामुळे अर्धा तास लेट पोचलो. गेल्या गेल्या प्रणीताच्या प्रेमळ स्वागताने लेट पोचल्याचा ताण निघून गेला. तिने आधी मुलींना नाश्ता देऊ असे म्हटल्याने दिलेल्या तीन मोठ्या हॉल मध्ये मुलींनी आपापल्या बॅग्स ठेवल्या आणि सर्वांना मेस मध्ये नेऊन नाश्ता करायला लावला. पोहे व उपमा असा बेत होता. मुलींनी पोह्यांवर चक्क ताव मारला. उपमा कमी राहिला पण पोहे मात्र पुन्हा करायला लागले. चहा नाश्ता होई पर्यंत जरा सगळेच सैलावले. मुलींनी रूमवर पाठवले कपडे बदलायला. कारण त्यांना पाण्यात खेळायला पाठवायचे होते. त्यांचे होईपर्यंत आमचा सुद्धा नाश्ता झाला. खरंच पोहे अतिशय उत्तम झालेहोते, उपमा सुद्धा छान होता. पालव मॅडमचा उपवास म्हणून प्रणीताने रताळ्याचा उपमा बनवला होता. तो तर अप्रतिम झाला होता. पालव मॅडम पेक्षा आम्हीच जास्त खाल्ला. मुली तयार होऊन आल्या आणि आम्ही रेन डान्स कडे गेलो. तिथे रिव्हर क्रॉसिंग साठी पुल बांधला आहे. त्यावर मुली चालत गेल्या. अजून तसाच पूल आहे त्यावर सुद्धा काहीजणी गेल्या. रेन डान्स करून झाला आणि काहीजणी swimming pool कडे गेल्या. स्विमिंग पुल अगदी छोटा, जास्त खोल नाही त्यामुळे जवळजवळ २/३ तास मुलींनी पाण्यात मजा केली. तिथेच artificial waterfall आहे, fountain आहे, खूप मजा करून १.३०/२ च्या सुमारास आम्ही त्यांना बाहेर काढले व change करून यायला वेळ दिला. आल्यावर जेवण सुरू केले आणि मुली जेवणावर तुटून पडल्या. छोले पुरी, वरण भात, जिलेबी, पापड, लोणचे असा बेत होता. पाण्यात खेळल्यामुळे त्या दमल्या होत्या आणि भुकेल्या होत्या. त्यात जेवण चविष्ट म्हटल्यावर काय होणार! जेवून झालेल्या मुलींना बैलगाडीतून फेरफटका मारायला पाठवले. बाकी शिक्षक जेवून घेईपर्यंत आम्ही तिघी, मी, साळवे मॅडम, पालव मॅडम, तिथे बसून होतो. २/३ शिक्षिका आल्या तशा आम्ही जेवायला गेलो.  बैलगाडीतून जाणे मुंबईच्या लोकांना माहीतच नाही. त्यामुळे मुलींनी तो अनुभव आनंदाने घेतला. ते झाल्यावर खेळाच्या मैदानात, घसर गुंडीवर,  झोपाळ्यावर, नेटवर त्यांना खेळायला मिळाले. क्रिकेट खेळून झाले, काही तर reels सुद्धा बनवत होत्या. अर्थात मोबाईल त्यांना आणायचा नाही असे सांगितले होते तरीही त्यांची ती मजा त्या घेत होत्या. संध्याकाळचे ४/४.३० वाजले आणि आम्हाला निघण्याचे वेध लागले.  मुलींना निघायचे नव्हते, त्यांचा पाय निघत नव्हता. निघताना प्रणिताने चहा सोबत वडापाव दिला आणि मुली खुषच झाल्या. विष्णुबागतर्फे त्यांचा एक व्हिडिओ घेतला तेव्हा मुलींनी आवर्जून जेवण आवडले असे सांगितल्यावर प्रणिताचा चेहरा उजळला. खूप आनंदी झाली ती. सचिन सुद्धा दुपारी आला होताच. मुली खुश होऊन जाताना दोघेही उभयतां खूप खुश झाले होते. आग्रहाने खाऊ घालण्यात दोघांचाही हात धरायला नको. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. विष्णु बागेत येणाऱ्या पर्यटकांना आपले म्हणून दोघेही वागवतात, समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने, आदराने, आपलेपणाने बोलतात त्यामुळे पर्यटक समाधानी होऊन निघतात. आमच्या मुलींची दुसऱ्या दिवशी पोट बिघडले म्हणून तक्रार आलीच नाही यावरून लक्षात आलेच असेल की आमची पिकनिक यशस्वी झाली. यायला ट्रॅफिकमुळे वेळ लागला पण सर्व मुली खुश होत्या. आम्हाला पण हेच तर हवे असते!! 
शालेय जीवनात घडणऱ्या चांगल्या वाईट गोष्टी लक्षात रहातात. काही आपण विसरून जातो पण "सहल " मात्र नेहमीच आठवणीत राहते. तिची आठवण मुलींना चांगलीच असावी यासाठी आमचाही कटाक्ष असतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

SSM दहीहंडी

Girls power

विद्यार्थीहो .... तुमच्यासाठी....